कोल्हापूर- दोन अल्पवयीन मुलांकडून 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या चंदूर इथल्या शाहूनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घराशेजारीच राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांकडून हे कृत्य घडल्याचे तपासात समोर आले आहे.
मुलीला खाऊचे आमिष दाखवून शेतामध्ये नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून विहिरीत ढकलून दिल्याची कबुली संशयित अल्पवयीन मुलाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजीमधील चंदूर इथल्या शाहूनगर भागात मृत मुलीचे कुटुंबीय आणि संशयित अल्पवयीन मुले राहतात. रविवारी दुपारच्या सुमारास या मुलीला एका अल्पवयीन मुलाने चॉकलेटचे आमिष दाखवून नजीकच असलेल्या एका शेतामध्ये नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करून तिला जवळच्या विहिरीत ढकलून देऊन तिची हत्या केली. घरच्यांनी मुलीचा शोध घेतला असता त्यांना त्या विहिरीमध्ये मुलगी आढळली. खेळता-खेळता विहिरीत पडली असावी, असे समजून त्यांनी काल तिचा मृतदेह दफन केला. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवून या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली.