धुळे - तालुक्यातील बोरकुंड येथील अवघ्या २२ वर्षाचा तरुण विनाभिंतींच्या शाळेत मेंढपाळांच्या मुलांना ज्ञानदान देण्याचे काम करतो. मागासलेल्या समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी तसेच कालबाह्य होत चाललेली गुरुकुल पद्धत पुन्हा पुनरुज्जीवित व्हावी या उद्देशाने हा तरुण त्या मुलांना शिकवायला जातो.
शिक्षक दिन विशेष : अवघ्या २२ वर्षांचा तरुण मेंढपाळांच्या मुलांना देतोय व्यवहार ज्ञानाचे धडे - धुळे लेटेस्ट न्यूज
आज ५ ऑगस्ट म्हणजे शिक्षक दिन आहे. त्यानिमित्त धुळ्यातील मेंढपाळांच्या मुलांना शिकविणाऱ्या अवघ्या २२ वर्षाच्या तरुण शिक्षकसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...
सचिन देविदास देवरे (२२), असे या तरुणाचे नाव आहे. त्याने विद्यावर्धिनी महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता समाजासाठी काहीतरी करावे या उदात्त विचारातून त्याने ज्ञानदान करण्यास सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना ज्ञानगंगेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सचिन देवरे यांनी गुरुकुल पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली 16 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. प्रत्येकाला व्यवहारज्ञान तरी मिळावे या उद्देशाने सचिन देवरे निसर्ग शाळा चालवतात. त्यांच्या शाळेला कोणतीही भिंत नसून गेल्या दीड वर्षांपासून सचिन देवरे हे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
निसर्ग हीच मोठी शाळा असून निसर्गातून जे शिकायला मिळते ते अन्य कुठेही शिकायला मिळत नाही, असेच मत सचिन देवरे यांनी व्यक्त केले. पहाटे चार वाजता सुरू झालेली शाळा रात्री दहा वाजेपर्यंत त्याचे ज्ञानदानाचे कार्य सुरू असते. अभ्यासासोबत व्यायाम, खेळ या माध्यमातून तो विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यातून मेंढपाळांच्या मुलांना शिक्षणाबरोबरच व्यवहारज्ञान प्राप्त होते. आजचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी.