महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून 164 जणांना तीन वर्ष धुळे महानगरपालिका निवडणूक लढवण्यास बंदी - mim dhule news

धुळे महानगरपालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. यासाठी ३५६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता.

DHULE
धुळे महानगरपालिका

By

Published : Feb 18, 2020, 5:36 PM IST

धुळे- महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे १६४ उमेदवारांवर पुढील तीन वर्षे पालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केली. त्यात धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शाह यांचा देखील समावेश आहे.

धुळे महानगरपालिकेची डिसेंबर २०१८ मध्ये निवडणूक झाली. यासाठी ३५६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून दैनंदिन खर्चाचा तपशील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक महिन्यात सादर करायचा होता. त्यानुसार १६७ उमेदवारांनी खर्चाचा तपशील सादर केला नाही. या उमेदवारांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे नोटीस बजावून खुलासा सादर करण्याची मुदत दिली होती. त्यासाठी वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. यात १६४ जणांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यामुळे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मनपा कलम १० (१ ई) अन्वये १६४ जणांवर अनर्हतेची (अपात्र ) कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधितांना सदस्य म्हणून निवडणुकीस उभे राहण्यास तीन वर्षासाठी अपात्र केले आहे.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत विद्यमान आमदार फारुख शाह यांनी प्रभाग क्रमांक १३ अ मधून उमेदवारी केली होती, मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, भाजपच्या सोनल शिंदे हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून आहेत. अनर्हतेची कारवाई झालेल्यांमध्ये तत्कालीन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती माधुरी अजळकर, माजी सभागृह नेता अरशद शेख, माजी नगरसेवक रमेश बोरसे यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे धुळ्यात राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. या संदर्भात धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शाह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण मुंबईत एका बैठकीत व्यग्र असल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details