धुळे - शिरपूर येथून मालेगावला अवैधपणे नेला जाणारा 10 किलो गांजा मोहाडी पोलिसांनी जप्त केला. हा गांजा मालेगावमधून मुंबई येथे विक्रीसाठी जाणार होता. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे.
धुळ्यातून मुंबईला विक्रीसाठी जाणारा 10 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला संशयित कारचा केला पोलिसांनी पाठलाग -
शिरपूरहून मालेगावकडे जाणार्या एका पांढर्या कारमधून गांजा तस्करी होत असल्याची माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी योगेश राजगुरु यांना मिळाली होती. मात्र, त्याकारवर 'महाराष्ट्र शासन' असे लिहिलेले होते. या कारला पकडण्यासाठी अधिकारी राजगुरु यांनी सहकाऱयांसह टोलनाक्याच्या पुढे एका गतीरोधकाजवळ सापळा रचला. कार जवळ येताच तिला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, पोलिसांना पाहून चालकाने कार थांबवण्याऐवजी गाडीचा वेग वाढवला. यामुळे पोलिसांचा संशय खात्रीमध्ये बदलला. परिणामी, पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून गाडी ताब्यात घेतली. कारची झडती घेतली असता त्यात गांजा आढळला.
कारला होते 'महाराष्ट्र शासना'चे स्टिकर -
सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना प्रवासी वाहतूक परमीट असलेली कार मादक पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टोल नाक्याजवळ सापळा रचला. कार शिरपूरकडून येताना दिसताच तिला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. या कारला 'महाराष्ट्र शासना'चे स्टिकर लावले असल्याचे निदर्शनात आले. कारचालकाने कार न थांबवता तशीच पुढे पळवल्याने पोलिसांनी या कारचा पाठलाग केला.
दहा किलो गांजा जप्त -
ताब्यात घेतलेल्या कारची तपासणी केली असता त्यात कागदी पुड्यांमध्ये पॅक केलेला १० किलो १६१ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याची किंमत ४० हजार ६४४ रुपये आहे. या गांजासह ३ लाख रुपये किमतीची कार, गाडीतील चालक इरफान अन्सारी जवळील ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल व त्याचा साथीदार महमंद कुरेशी याच्या जवळील ३ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख ४६ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात कारचालक ईरफान युसूफ अन्सारी (वय ३७) व मोहम्मद रेहान मो. हनिफ कुरेशी (वय १९) दोघे राहणार अंधेरी पश्चिम, मुंबई या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.