चंद्रपूरYouths Drowned During Ganesh Immersion:सावली येथील सार्वजनिक जय बजरंग युवा गणेश मंडळ, सावलीचा राजा, सावलीचा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ अशा तीन गणेश मूर्तीचे विसर्जन होणार होते. सावली येथील असोलामेंढा नहरात मूर्तीचे विसर्जन होणार होते. त्यानुसार आज (रविवारी) ही मिरवणूक वाजत गाजत तिथे गेली. त्यापैकी सावलीचा राजा व विघ्नहर्ता हे दोन गणपती स्थानिक लहान तलावामध्ये विसर्जित करण्यात आले. तर जय बजरंग बली मंडळाचा गणपती आसोलामेंढा नहरात विसर्जन करण्यासाठी सर्वजण गेले. गणपती विसर्जन करताना पाण्याच्या प्रवाह हा अधिक असल्याने पाच जण वाहून गेले. यात दोघा जणांना तेथील लोकांना कसेबसे काढण्यात यश आले. मात्र, तीन जण बुडत वाहून गेले. यातील गुरुदास मोहूर्ले या युवकाला काही अंतरावर पकडण्यात आले. मात्र जेव्हा रुग्णालयात त्याला नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर गुंडावार बंधूंचे मृतदेह सायंकाळच्या सुमारास सापडले.
लहान्याला वाचवायला मोठा भाऊ गेला:एकाच कुटुंबातील दोन भाऊ यात मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. निकेश आणि संदीप गुंडावार हे अत्यंत सामान्य कुटुंबातील होते. चांदली या गावात हे दोघे भाऊ रसवंती चालवत होते. गणेश विसर्जन प्रसंगी आपला लहान भाऊ संदीप वाहून जात असताना बघताच मोठा भाऊ निकेश याने त्याला वाचविण्यासाठी लगेच नहरात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने हे दोघे भाऊ वाहून गेले. सायंकाळी त्यांचे मृतदेह सापडले.