चंद्रपूर:बेळगाव येथे पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून तेथे नळाची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. बीड जिल्हा निवासी भागवत जगताप यांनी या कामाचे कंत्राट घेतले होते. 1 एप्रिलला पाईप टाकण्याचे काम सुरू होते. हे काम अवसरे कुटुंबाच्या घराजवळ सुरू होते. यावेळी मजूर राहुल जगदाडे याची महिलांकडे पाहण्याची नजर वाईट आहे, असे सांगत राहुल जगदाळेला आरोपी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांनी थेट मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या मजुराला दोरीने ट्रॅक्टरला बांधले आणि त्याला अमानुष मारहाण सुरू केली.
मजुराला बेदम मारहाण: यानंतर त्याला अश्लील शिवीगाळ करत त्याचे कपडे फाडत त्याला पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. पीडित राहुलला धारदार शस्त्र दाखवून त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. विशेष म्हणजे, हा सर्व घटनाक्रम आरोपींनी आपल्या मोबाईलमधून चित्रित केला. यानंतर यातील अनेक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आणि समाजमाध्यमांत संतापाची लाट उसळली. यानंतर कंत्राटदार जगताप यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. स्थानिक पोलिसांंनी आरोपी दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र हे कलम जामीनपात्र असून यात आरोपी सहज सुटू शकतात, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तुर्तास पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
कामाला जात नसल्याने मजुरास मारहाण:ऊस तोडणीच्या कामाला जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने, गेवराई तालुक्यातील एरंडगावच्या एका ऊसतोड मजुराने शुक्रवारी (26 सप्टेंबर, 2020 रोजी) आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली होती.