चंद्रपूर -चंद्रपूर जिल्ह्यात 2021 मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. यात सर्वात महत्वाची घटना म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या (Liquor ban lifted in Chandrapur) निर्णयासंबंधात घडली. तब्बल सहा वर्षांनंतर चंद्रपुरातील दारूबंदी (Liquor ban in Chandrapur) हटविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तर दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना घडली. जिवती तालुक्यात मागास समाजातील काही लोकांना जादूटोणा केल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण करण्यात आली, अशा महत्वाच्या घटना व घडामोडींचा हा घेतलेला आढावा.
Chandrapur Year Ender 2021 : सहा वर्षांनी उठवली दारूबंदी.. जादुटोण्याच्या संशयातून जमावाची मारहाण; यासह 'या' घडामोडींनी चर्चेत राहिला जिल्हा - Liquor ban lifted in Chandrapur
2021 या वर्षात अनेक घटना व घडामोडींनी चंद्रपूर जिल्हा बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिला. मावळत्या वर्षात लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर चंद्रपूर जिल्ह्यातील ( Chandrapur District year Ender 2021 ) या वर्षातील महत्त्वाच्या घटना लक्ष वेधत होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातील मावळत्या वर्षातील महत्वाची घटना ( Important events in the year 2021 in Chandrapur district) म्हणजे गेल्या सहा वर्षापासून असलेली जिल्ह्यातील दारूबंदी सरकारने उठवली. त्याचबरोबर मागास समाजातील लोकांना सवर्णांनी केलेली मारहाण, एकाच कुटूंबातील सहा जणांचा झोपेतच झालेला मृत्यू या व अशा अन्य घटनांनी जिल्ह्यातील समाजमन ढवळून निघाले.
chandrapur year-ender-2021
अखेर दारूबंदी उठली -
- सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा (Liquor ban lifted in Chandrapur) निर्णय राज्य सरकारने घेतला. 1 एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. तेव्हापासूनच जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. याबाबत तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाम भूमिका घेतली होती. राज्यात सत्तापालट झाला आणि वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांनी आपण जिल्ह्यातील दारुबंदी उठविणार अशी घोषणा केली होती. अखेर 27 मे 2021 रोजी जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाहनांमुळे होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूमुळे व्यवस्थापनाने मार्गावर 63 गतिरोधक निर्माण केले. बफर क्षेत्रात अनेक गावे असल्याने या गतिरोधकांचा त्रास गावकऱ्यांना होऊ लागला. त्यामुळे हे गतिरोधक हटविण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापन आणि गावकरी आमने-सामने उभे ठाकले. एवढ्यात 11 जूनला या वादाने पेट घेतला. सर्पदंशामुळे 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गतिरोधकांच्या अडथळ्यांमुळे मुलाला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले नाही, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आणि यासाठी ताडोबा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी या मुलाचा मृतदेह थेट ताडोबाच्या कार्यालयात आणून ठेवला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अजूनही याबाबत गावकऱ्यांची तक्रार कायम आहे.
- भारत बायोटेकच्या संस्थापकांची आनंदवनला अनोखी भेट -
जून महिन्यात कोरोनाची भयंकर लाट सुरू होती. याच दरम्यान लसीकरणाला देखील सुरुवात झाली होती. मात्र अनेक ठिकाणी लसीकरणाचा पुरवठा मर्यादित होता. कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन ठरलेले आनंदवनाला मात्र या काळात अनोखी भेट मिळाली. भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन लस विकसित केली होती. या कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि संचालक डॉ. कृष्णा ईल्ला हे आनंदवन येथील महाविद्यालयातच शिकले. एक माजी विद्यार्थी म्हणून छोटीसी परतफेड म्हणून आनंदवनला त्यांनी मोठा सुखद धक्का दिला आहे. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून तब्बल 4,000 हजार लसींचा डोस त्यांनी थेट आनंदवनात पाठवला.
- अखेर दुकाने उघडली -
तब्बल पाच वर्षांच्या दारूबंदीनंतर अखेर 5 जुलैला जिल्ह्यातील दारूची दुकाने आणि बार सुरू झाले. यात पहिल्या दिवशी मद्यपींची अक्षरशः झुंबड उडाली. बारमध्ये येणाऱ्या गर्दीला बसण्यासाठी जागाच उरली नसल्याने पार्सलच्या माध्यमातून दारुविक्री करावी लागली. त्यातही असलेला दारूचा माल हातोहात विकला गेला.
- शहरात भरदिवसा गोळीबार -
12 जुलैला चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली. चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. त्या युवकाने परिसरातील एका युवकावर गोळीबार करून पळ काढला. यापूर्वी बल्लारपूर येथे सुरज बहुरिया याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येमागे हा युवक असल्याचा आरोप होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला, ज्यात हा युवक गंभीर जखमी झाला.
- एकाच कुटुंबातील सहा जणांचा झोपेत मृत्यू -
13 जुलैला दुर्गापूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दूर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांचा मुलगा अजय लष्कर याचा नुकताच विवाह झाला होता. लग्नसमारंभाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्व पाहुणे आपापल्या गावी गेले. आदल्या रात्री मुसळधार पाऊस आल्याने अचानक वीज खंडित झाली. यानंतर लष्कर कुटुंबाने जनरेटर लावले आणि सर्व जण झोपी गेले. सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान कुटुंबातील सर्व जण उठून जातात. मात्र, उशिरापर्यंत यापैकी कोणीही उठले नाही. शेजारच्या लोकांनी पाहणी केली तेव्हा सहा जण झोपेतच मृत्युमुखी पडलेले आढळले. जनरेटरमधून विषारी वायूच्या गळतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते.
- वीज जोडणीसाठी डोंग्याने प्रवास -
चंद्रपूर परिमंडळातील बल्लारशा विभागांतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक (गंगापूर) गावातील ०२ कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. या गावात पोचण्यासाठी पक्का रस्ता नाही, नदी दुथडी भरून वाहत होती. अशा स्थितीत नदीत नाव सोडून रोहित्र या गावात नेण्यात आले. या घटनेची दखल खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली. त्यांनी ट्विट करत चंद्रपूर परिमंडळाचे अभिनंदन केले.
- जादूटोण्याच्या संशयावरून मागास जातीतील लोकांना अमानुष मारहाण -
जिवती तालुक्यात पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना 23 ऑगस्टला उजेडात आली. जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मागास समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (५३), साहेबराव एकनाथ हुके (४८), धम्मशिला सुधाकर हूके (३८), पंचफुला शिवराज हुके (५५), प्रयागबाई एका जबर जखमी झाले. या प्रकरणात 13 जणांना जिवती पोलिसांनी अटक केली.
- लसीकरणासाठी 'जान की बाजी'
पोंभूर्णा तालुक्याचे शेवटचे टोक असलेले गंगापूर व गंगापूर टोक ही दोन गावे वैनगंगा नदीने वेढलेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे अंतर्गत येत असलेल्या या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी फक्त डोंग्याचा वापर करून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चहू बाजूने पाण्याने वेढलेल्या गंगापूर गावाचे लसीकरण कसे करायचे हा यक्ष प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा होता. पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी हे आव्हान स्विकारून गंगापूर गावात लसीकरण पार पाडण्यासाठीची मोहीम हाती घेतले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांनी चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गाव गाठले. हा प्रवास मोठा थरारक आणि धडकी भरविणारा होता. गावातील आशासेविका व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ३० ऑगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. गंगापूर या गावाची संपूर्ण लोकसंख्या ३४० च्या आसपास आहे. गंगापूर गावातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या १३६ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. आणि दुर्गम गाव असलेल्या गंगापूर गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले.
- चंद्रपुरात पडला फेसयुक्त पाऊस
21 सप्टेंबरला चंद्रपुरात मुसळधार पाऊस झाला. या पावसासोबत साबणयुक्त फेस पडल्याचे वेगळेच चित्र बघायला मिळाले. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार दिसून आला. मात्र याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला. काही भागात तर या फेस पुंजक्यांचा वर्षाव बघायला मिळाला. सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस पसरला होता. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी आहेत. औष्णिक वीज केंद्र आणि कोळसा खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणासोबत पावसाच्या पाण्याचे संयुग झाल्याने हा फेस तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली होती.
Last Updated : Dec 28, 2021, 9:31 AM IST