चंद्रपूर -जिल्ह्याच्या तेलंगाणा सीमेलगत असलेल्या भंगाराम तळोधी येथे दारू तस्करांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडण्यात आलेली दारू माजी पंचायत समिती सदस्याची असल्याचे आरोपींनी जबाबात सांगितले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तिघे फरार असल्याची माहिती आहे. तुळशीराम पोटे (भं. तळोधी), दुर्योधन बडगे (रा. सुपगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, नरू उर्फ दाना पोटे (रा. मक्ता), संदीप बडगे, कालिदास आऊतकर (रा. सुपगाव) हे आरोपी फरार आहेत. या कार्यवाहीत दोन लाखांच्या दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोंडपिपरी तालुक्यात छुप्या मार्गाने अवैध दारूची तस्करी सूरू आहे. तालुक्याला लागूनच तेलंगाणा राज्याची सीमा आहे. येथून मोठ्या प्रमाणात तालुक्यात दारू येत असल्याचे बोलले जाते. अशातच सोमवारच्या रात्री वर्धा नदीच्या घाटावरून नंदवर्धन-अडेगावमार्गे येणाऱ्या एका दुचाकीमध्ये दारू येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील संदीप इंगोले, शुभम येडस्कर हे अन्य सहकाऱ्यांसह नंदवर्धन-अडेगाव मार्गावर पाळत ठेऊन होते. रात्रीच्या सुमारास एक संशयास्पद दुचाकी (एमएच 34 एजी 3662) येताना पथकाला दिसली. या दुचाकीला थांबवून चौकशी केली असता तेलंगणा येथील विदेशी दारू आढळून आली. यात दोन आरोपींना पकडण्यात पथकाला यश आले तर तीन आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीच्या चौकशीअंती विदेशी दारूसह एकूण 2 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केला आहे.