चंद्रपूर- तेलंगाणात अडकून पडलेल्या मजुरांनी अखेर गाव गाठले. मात्र, या मजुरांना गावात पोहोचूनही घरी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने या मजुरांचे गावापासून दूर असलेल्या खासगी शाळेत विलगीकरण केले आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर गावी परतल्यानंतर मजुरांची स्वगृही जाण्याची तळमळ आता तरी थांबणार, असे वाटत असतानाच मजुरांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
स्थलांतरित मजुरांची व्यथा : गाव आले मात्र घर नाही, 14 दिवसांसाठी केले क्वारंटाईन - Lockdown 2
चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथील खासगी शाळेच्या इमारतीत जवळपास 30 मजुरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या मजूरांचे शाळेच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घर आहे. मात्र, डोळ्यांना घर दिसत असतांनाही हे मजूर घरी जाऊ शकत नाहीत.

चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा येथील खासगी शाळेच्या इमारतीत जवळपास 30 मजुरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या मजूरांचे शाळेच्या इमारतीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घर आहे. मात्र, डोळ्यांना घर दिसत असतांनाही हे मजूर घरी जाऊ शकत नाहीत. प्रशासन या सर्वांची काळजी घेत आहे. मात्र, घरासमोरच बंदी असल्याच्या जाणिवेने मजूर हळवे झाले आहेत.
लॉकडाऊन देशात कायम असला तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे तेलंगणात अडकलेले हजारो मजूर चंद्रपूर जिल्ह्यात आले. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. पोडसा येथे हजारोचा संख्येने मजूर गोळा झाले आहेत. खासगी वाहनांनी हे मजूर स्वत: चे गाव गाठत आहेत. मात्र, मजुरांना गावात प्रवेश नको, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मजुरांचे गावापासून लांब असलेल्या इमारतीतच विलगीकरण करण्यात आले आहे.