महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदीच ठरली बचतगटासाठी सोन्याची संधी; मास्कनिर्मितीने ग्रामीण महिलांना आर्थिक आधार

पांढरकवडा गावातील महिला बचतगटाचा टाळेबंदीत कायापालट झाला. मात्र, यापूर्वीची स्थिती अत्यंत कठीण होती. कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेक व्यवसाय बघता-बघता ठप्प पडले. याची झळ 'घे भरारी' या बॅग शिलाई केंद्रालाही बसली. त्यानंतर या महिलांनी संधीचं सोने करत पुन्हा व्यवसायात भरारी घेतली.

By

Published : Jun 26, 2020, 6:19 PM IST

Updated : Jun 26, 2020, 7:09 PM IST

chandrapur
बचत गटातील महिला

चंद्रपूर- चांगला व्यवसाय तोच, ज्याला बाजारपेठेत मागणी असते. कोरोनाने सध्या संपूर्ण जग बदलून गेले, अनेकांचा रोजगार हिरावला गेला. मात्र, या दरम्यान काही वेगळ्या संधी सुद्धा उपलब्ध झाल्या. या संधीचं सोनं पांढरकवडा गावातील महिलांच्या बचतगटाने केलं. मागणीनुसार मास्कची निर्मिती त्या करीत आहे. या माध्यमातून विस्कटलेली आर्थिक घडी या महिला सावरत आहेत. यातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक रोजगार मिळाला आहे.

टाळेबंदीच ठरली बचतगटासाठी सोन्याची संधी; मास्कनिर्मितीने ग्रामीण महिलांना आर्थिक आधार

चंद्रपूर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरकवडा गावातील एका महिला बचतगटाचा टाळेबंदीत कायापालट झाला. मात्र, यापूर्वीची स्थिती अत्यंत कठीण होती. कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि अनेक व्यवसाय बघता-बघता ठप्प पडले. याची झळ 'घे भरारी' या बॅग शिलाई केंद्रालाही बसली. याच्या अध्यक्षा रंजना डवरे या आहेत. वीजनिर्मिती करणाऱ्या धारिवाल कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून हा उपक्रम सुरू केला गेला होता. याची जबाबदारी पेहल मल्टिपर्पज सोसायटीला देण्यात आली होती. याकरीता कंपनीचे सहव्यवस्थापक धीरज तोटेवार यांनी लक्ष दिले. यात त्यांना शिलाई मशीन आणि बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. हे काम करणाऱ्या महिला दारोदारी या बॅग विकायच्या. शासन आणि रोटरी क्लबच्या प्रदर्शनांत त्या बऱ्यापैकी विकल्या जायच्या. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, कोरोनामुळे अर्थिक घडी विस्कटली.

अशा वेळी आता बॅग कोणी घेईना. त्यामुळे अर्थिक मिळकतही थांबली होती. मात्र, या चाणाक्ष महिलांनी संधी हेरली. त्यांनी मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला. याला धारिवाल कंपनी व्यवस्थापनाने पाठबळ दिले. या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून तब्बल पाच हजार मास्कची ऑर्डर आली. ती त्यांनी सहज पूर्ण केली. अत्यंत चांगल्या दर्जाचे मास्क या महिलांनी तयार करून दाखवले. यानंतर धारिवाल कंपनी आणि पेहल सोसायटीने दोन हजार मास्कची ऑर्डर दिली. बघता बघता या महिलांनी भरारी घेतली. आतापर्यंत जवळपास 10 हजार मास्क या महिलांनी तयार केले. आता मागणीचा ओघ सुरू आहे. अनेक खासगी कंपन्या शासकीय संस्थांकडून ही मागणी येत आहे. त्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना कोरोनाच्या परिस्थितीने मोठी संधी उपलब्ध करून दिली. याचे सोने 'घे भरारी' च्या महिलांनी केले आहे.

Last Updated : Jun 26, 2020, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details