चंद्रपूर - जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील १३ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. ग्रामपंचायतेकडे लाखोंचा पाणी कर थकीत असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागने ही कार्यवाही केली आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठा ठप्प झाल्याने १३ गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक गावात नैसर्गिक पाण्याचे स्तोत्रच नाही.
धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून १३ गावांना पाणीपुरवठा केला जातो. योजनेत धामणपेठ, वटराणा, धाबा, दूबारपेठ, चिवंडा, सोमणपल्ली, सोमणपल्ली हेटी, डोंगरगाव, चकदरुर, कोंढाणा, मंगलपेठ, बेघर या १३ गावांचा समावेश आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीकडे लाखोंचा पाणी कर थकीत आहे. साधारणत: महिणाभरापुर्वी ग्रामीण पाणीपुरवठा योजना चंद्रपूर विभागाने पत्र पाठवून थकीत कर भरण्याचा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायतीनी कर भरला नाही. त्यामुळे विभागाने सोमवारपासून पाणीपुरवठा बंद केला आहे.