चंद्रपूर - वरोरा शहरातील शर्मा पान मटेरीयल येथील गोडाऊनमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा अवैध साठा असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. वरोरा पोलिसांनी या कारवाईत सुमारे दोन लाखांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
हेही वाचा...भारताचे शेजारी देश कसा करत आहेत कोरोनाशी सामना..?
चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखूपासून तयार करण्यात येणार खर्रा हा प्रसिद्ध आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात याच खर्यामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत पोलीस प्रशासन दक्ष झाले असून अशा तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वरोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंदाजे २ लाख ८ हजार ८२८ रूपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा वरोरा पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी या कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविले आले. या विभागामार्फत सदर गुन्ह्याची नोंद केली जाईल. सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.