चंद्रपूर- जिल्ह्यातील तीन मोठ्या नद्या प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित असल्याचे अहवालात म्हटले आहे. राजूरा, गोंडपिपरी तालुक्यातील लाखो नागरिकांची तहान वर्धा, वैनगंगा नदीच्या पाण्याने भागविली जाते. पिण्यात येणारे पाणी प्रदूषित असल्याने भविष्यात नागरिकांना आरोग्याचा समस्यांना समोरे जावे लागणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१८-२०१९ चा पाणी गुणवत्ता स्थिती अहवाल जाहीर केला आहे. वाटर क्वालिटी स्टॅटस या अहवालात महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित नद्या नागपूर जिल्ह्यात आढळल्या आहेत. अहावालानुसार २०१७ च्या तुलनेत प्रदूषण कमी झाल्याचे म्हटले आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील १७६ नद्या आणि इतर ठिकाणी समुद्र, धरणे कुपनलिका, विहिरी इत्यादी मिळून २८८ पाणी गुणवत्ता तपासणी केली आहे. केंद्राच्या आणि ६६ भूजल सर्वेक्षण केंद्राच्या माध्यमातून अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रदूषणाच्या आधारावर मंडळाने महाराष्ट्रातील पाणी प्रदूषण निर्देशांक ठरविला आहे.
या सर्वेक्षणात पाण्याचे ४३ मापदंड तपासण्यात आले. परंतु निर्देशांक ठरविताना पीएच, डीओ, बीओडी आणि टी- इकोलाई हे मापदंड ठरविण्यात आले. या मापदंडानुसार महाराष्ट्रातील तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आढळली. सोबतच कमी प्रमाणात वर्धा, वैनगंगा, प्राणहीता या नद्या देखील प्रदूषित आढळल्या.