चंद्रपूर- दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात इतर ठिकाणाहून विदेशी दारू येत नसल्याने गावठी दारूची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका ठिकाणी बनवलेली मोहाची दारू गावोगावी पोहोचवली जात आहे. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे त्रस्त कोठारी गावाच्या नागरिकांनी स्वतःच दारूसाठ्यासह दोन आरोपींना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गावकऱ्यांनाच हे करावे लागत असेल तर पोलीस नेमके काय करत आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दारू तस्करांकडे पोलिसांचे दुर्लक्ष, संतप्त गावकऱ्यांनीच पकडली दारू - गावकऱ्यांनी पकडली दारु
चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी गावाच्या नागरिकांनी स्वतःच दारूसाठ्यासह दोन आरोपींना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. गावकऱ्यांनाच हे करावे लागत असेल तर पोलीस नेमके काय करत आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सध्या विदेशी दारू जिल्ह्यात येत नसल्याने मोह फुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या गावठी दारूला प्रचंड मागणी आली आहे. ही दारू पूर्वीच्या किंमतीपेक्षा पाच ते सहा पट जास्त किंमतीने विकली जात आहे. ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळी यंत्रणाच तयार झाली आहे. यात ग्रामीण भागातील काही प्रतिष्ठीत लोक, राजकीय पदाधिकारी आणि पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. या यंत्रणेच्या आशीर्वादाने दारूचा गोरखधंदा जोमात सुरू आहे. त्यामुळे अशा तस्करांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आज अशाच प्रकारे दारुतस्करी केली जात असताना गावकऱ्यांनी याचा पर्दाफाश केला. एक पुरुष आणि एक महिला हातात पोते घेऊन दुचाकीने गावात आले. (एमएच 34 बीए 8936) दुचाकीने येत असताना गावकऱ्यांनी त्यांना थांबवले. यावेळी पुरुष आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. तर महिला हाती लागली. याची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी होते दारूची तस्करी
कोठारी गावापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या विरुर गावाजवळ लभानगुडा येथील जंगलाच्या परिसरात या मोहाच्या दारूची मोठया प्रमाणात निर्मिती होते. ही दारू प्लास्टिकच्या मोठ मोठया थैल्यात टाकून त्या थैल्या पोत्यात भरल्या जातात. दुचाकीच्या मदतीने त्या गावोगावी पोहोचवल्या जातात. मग यातून दारू काढून ती प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरली जाते आणि प्रत्येकी हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीत ती विकली जाते. यासाठी महिलांचा देखील उपयोग केला जातो. महिला मागे पोते धरून बसते. बघणाऱ्या व्यक्तीला या पोत्यात धान्य असल्याचेच वाटते.