चंद्रपूर -दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत कायद्यात दुरुस्ती केली आहे. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यालगत असलेल्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही दारूबंदी घोषित करण्यात आली. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दारूची उघडपणे विक्री होत आहे.
माथोली या गावात एक देशी दारूचे दुकान सुरू झाले आहे. या विरोधात स्थानिक महिलांनी एल्गार पुकारला आहे. ग्रामसभेत याबाबत ठराव घेण्यात आला. या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. 1 एप्रिल 2015 मध्ये चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. तोपर्यंत चंद्रपूर जिल्हा हा दारूविक्रीमधून सर्वाधिक महसूल देणारा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा होता. दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी होऊ लागली. विशेषतः यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. काही पोलिसांना हाताशी धरून दारूचा अवैध व्यवसाय जिल्ह्यात चांगलाच फोफावला आहे.
हेही वाचा - राजकीय नेत्यांच्या नव्हे तर मतदारांच्या भरवशावर खासदार झाले; नवनीत राणांचा विरोधकांना टोला