चंद्रपूर - ओबीसी विद्यार्थ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पदभरतीवरील स्थगिती उठवून ओबीसींचा अनुशेष भरून काढणार, असे आश्वासन राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव करपाते, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव देवप्पा गावंडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, माजी आमदार प्रकाशजी शेडगे, पल्लवी रेणके, बाळासाहेब सानप, अरुण गरमडे, उमेश कोराम व इतर मान्यवर उपस्थित होते.
ओबीसी अनुशेष भरणार
या बैठकीत 22 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करुन नोकर भरतीवरील स्थगिती उठवून ओबीसी अनुशेष भरणार, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पदोन्नतीमधे झालेला अन्याय दूर करु व त्यासाठी परिपत्रक काढू, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांच्या एमपीएससीमधे निवड झालेल्यांना समांतर आरक्षणाअंतर्गत प्रलंबित नियुक्त्या मार्गी लावू असे वडेट्टीवार यांनी सागितले.
10 ऐवजी 50 विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
तसेच उपसमितीमार्फत प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 केंद्राप्रमाणे व इतर राज्याप्रमाणे लागू होईल, ओबीसींच्या 10 विद्यार्थ्यांऐवजी 50 विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यावे. शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करु, तसेच शासन सेवेत खुला/अराखीव महिला/माजी सैनिक/अगेनेस्ट महिला या जागेवर एससी/एसटी/ओबीसी/व्हीजेएनटी/एसबीसी मागासवर्गीय मधील गुणवत्ता धारक महिला/खेळाडू/माजी सैनिक/महिला या जागेवर गुणवत्ते नुसार उमेदवाराची नेमणूक करण्यात येईल या मागण्यांवर चर्चा झाली. लवकरच मागण्यांचे परीपत्रक काढून लागू करू, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
एमपीएससी पास झालेले विद्यार्थी उपस्थित
एमपीएससी पास झालेल्यांपैकी स्नेहा फरकाडे, निलेश तागड, गोपाल घुगे, पुजा पानसरे, संगीता चौधरी, जयश्री देवकाटे, अंजली केंद्रे, नयना वालकुंडे, रोहीनी पाळवे, शंकर खेडकर या विद्यार्थ्यांना झालेल्या निर्णयाचा फायदा होणार आहे व प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहे. सदर मागण्यांबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याअगोदर वारंवार निवेदने दिली व आंदोलने केली होती, त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
हेही वाचा -पंढरपुरात दोन दिवसाची संचारबंदी लागू, वारकरी व भक्तास येण्यास मनाई
हेही वाचा -दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कोरोना तपासणी; महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक