चंद्रपूर-Vijay Wadettiwar On OBC Meeting : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यात येऊ नये, ही प्रमुख मागणी घेऊन चंद्रपुरात ओबीसी समाज एकवटला आहे. खरं तर अशावेळी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविणे गरजेचं होतं. मात्र, 29 सप्टेंबरला ओबीसी नेत्यांची बैठक सरकारनं बोलाविली आहे. ज्या लोकांचे ओबीसी चळवळीत काहीही योगदान नाही, अशा बनावट ओबीसी नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलीय. यातून या सरकारची मानसिकता दिसून येतेय. त्यांना ओबीसींविषयी कुठलाही कळवळा नाही, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपुरात केला. चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ओबीसी आंदोलनस्थळी भेट दिली.
अन्नत्याग आंदोलन :ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, ही प्रमुख मागणी घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाप्रमुख रवींद्र टोंगे हे मागील 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. तब्बल 16 दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. आता त्यांची प्रकृती गंभीर आहे. यादरम्यान ओबीसी समाजाने अनेक आंदोलने केली. मात्र, शासनानं त्याची अद्याप गंभीर दखल घेतलेली नाही. त्यातही आता 29 तारखेला सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक बोलाविली आहे. मात्र, ज्यांचे चळवळीत काहीही योगदान नाही, अशांना यात निमंत्रित केलंय. त्यामुळे सरकार किती संवेदनशील आहे हे दिसून येतंय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.
विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या हातात सत्ता द्या. मी एका महिन्यात ओबीसीचा प्रश्न सोडवतो, असा दावा केला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर अनेक महिने लोटूनही अद्याप ओबीसींचा प्रश्न सुटलेला नाही. फडणवीस यांनीदेखील अद्याप संन्यास घेतला नाही- विजय वडेट्टीवार