चंद्रपूर- 'जिल्ह्यात दारूबंदी असतानाही दारूचा व्यवसाय जोमात सुरू आहे. लोक दूषित दारू पित आहेत. दारूमाफिया पोलिसांवर हल्ले करीत आहेत. दारूबंदी केल्यानंतर हेच मिळवायचे होत तर दारूबंदी करण्याला अर्थ काय? हे आता अति होतंय, त्यामुळे टाळेबंदी उठल्यावर यावर लवकरच ठोस निर्णय घेणार, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे बहुजनकल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पोलिसांवर हल्ल्यानंतर वडेट्टीवार संतापले हेही वाचा-बाबाजी का लंगर.. लॉकडाऊन काळात गरजूंसाठी २४ तास खुला, 20 लाख वाटसरूंची शमवली भूक
राज्यात सत्तांतर झाले. तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार, अशी चर्चा सुरू आहे. दारूबंदीच्या नफा-तोट्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली. टाळेबंदीमुळे या समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर जाऊ शकला नाही. जिल्ह्यातील दारूबंदी हा विषय थंडबस्त्यात गेला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यावर दारूतस्करांनी हल्ला केला आणि दारूबंदी पुन्हा चर्चेत आली.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता खूप झाले. दारूबंदीवर ठोस निर्णय घ्यावाच लागेल, असे पालकमंत्री म्हणाले. दारूबंदी हा काय उपाय नाही! प्रबोधन हाच यासाठीचा खरा उपाय आहे. मात्र, असे न करता थेट दारुबंदी लादण्यात आली. याचे विनाकारण विपरित परिणाम आपण भोगत आहोत, असे सांगून त्यांनी दारूबंदी उठविण्याचे संकेत दिले. पोलिसांवर दारूतस्करांचे हल्ले होत असतील. त्यात त्यांचा जीव जात असेल तर, या दारूबंदीचा काय फायदा? असा सवाल उपस्थित करीत आता यावर लवकरच एकदाचा ठोस निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.