चंद्रपूर- चंद्रपूरकरांनो तुम्ही जर ताजा भाजीपाला खात असाल, तर जरा सावधान. कारण, हा भाजीपाला वरवरून स्वच्छ जरी दिसत असला तरी तो सांडपाण्याने धुतला जात असल्याची दाट शक्यता आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये सांडपाण्याच्या एका नाल्यात भाजीपाला धुताना काही लोक दिसून येत आहेत. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात घालणारा आहे.
हेही वाचा -'अग्निसुरक्षा, आरोग्य प्रमाणपत्र नसताना मुंबईतील हॉटेल्स सुरू कशी'
चंद्रपुरात दररोज हजारो टन भाजीपाल्याची विक्री होते. मात्र, घेताना हा भाजीपाला ताजा व स्वच्छ दिसावा याची दक्षता घेतली जाते. मात्र, यासाठी चक्क सांडपाण्याचा वापर केला जातो. या पाण्याने या भाज्यांना स्वच्छ केले जाते, असे एका व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे.
हा भाजीपाला झरपट नाल्याच्या घाण पाण्यात धुतला जात आहे. हनुमान खिडकी, तुळजाभवानी मंदिराजवळ पहाटे सहा ते सातच्या दरम्यान या नाल्यात भाजीपाला धुतला जात आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात टाकणारे आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.