चंद्रपूर :विदर्भ ( Vidarbha activists ) हा पूर्वी मध्य प्रदेश प्रांतात येत होता. मात्र नंतर राज्यांची भाषवार संरचना झाली. येथील लोक मराठी भाषिक असल्याने हा भाग महाराष्ट्राला जोडण्यात आला, ज्याला सिपी अँड बेरार करार म्हणून ओळखले जाते. या करारानुसार विदर्भाचा अनुशेष भरून काढून येथील लोकांना समान संधी देण्याचे नमूद आहे. मात्र 50 वर्षे उलटून देखील विदर्भ हा अजूनही मागासच आहे. त्यामुळे या विरोधात विदर्भवाद्यांमध्ये कमालीचा रोष आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी ( Vidarbha activists protested at MP Balu Dhanorkar residence ) फार जुनी आहे. मात्र अजूनही वेगळा विदर्भ झालेला नाही.
लोकप्रतिनिधिंविरोधात आंदोलन -भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाची मोहीम चालविली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अग्रस्थानी होते. सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ करणार असे काही नेत्यांनी लिखितमध्ये दिले होते. मात्र केंद्रात आणि राज्यात सरकार आले असताना या नेत्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भ राज्य संघर्ष समिती आक्रमक आहे. विदर्भवादी नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून 'वेगळा विदर्भ द्या नाही तर खुर्ची खाली करा' या घोषणेच्या आधारावर लोकप्रतिनिधिंविरोधात आज आंदोलन करण्यात आले.