महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 29, 2021, 3:57 PM IST

ETV Bharat / state

विशेष : बल्लारपूर-कारवा क्षेत्रात आगळीवेगळी अशी पर्यटन सफारी

मध्यचांदा वनविभागाने बल्लारपूर-कारवा या क्षेत्रात आगळीवेगळी अशी पर्यटन सफारी 26 जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून असून पर्यटकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

unique-tourist-safari-in-ballarpur-karwa-area-in-chandrapur
विशेष : बल्लारपूर-कारवा क्षेत्रात आगळीवेगळी अशी पर्यटन सफारी

चंद्रपूर -व्याघ्रदर्शनासाठी विख्यात असलेले ताडोबा-अंधारी प्रकल्प नेहमी पर्यटनाने गजबजलेले असते. बुकिंग न मिळाल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड होतो. मात्र, अशा पर्यटकांना आता निराश होण्याची गरज नाही. कारण मध्यचांदा वनविभागाने बल्लारपूर-कारवा या क्षेत्रात आगळीवेगळी अशी पर्यटन सफारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे प्रादेशिक वनविभागात सुरू करण्यात आलेली, अशी देशातील पहिलीच सफारी आहे. 26 जानेवारीपासून याला सुरुवात करण्यात आली असून पर्यटकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिनिधिचा रिपोर्ट

जाणून घ्या कारवा सफारीविषयी -

कारवा सफारीचे प्रवेशद्वार हे नागपुरपासून 170 किलोमीटर आहे. चंद्रपूरहून जुनोनामार्गे हे अंतर 19 किलोमीटर, तर बल्लारपूरपासून हे अंतर अवघे सहा किलोमीटर आहे. प्रतिव्यक्ती अवघे 500 रुपये इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. तर गाईडचे शुल्क हे 350 रुपये आहे. दिवसातून दोनदा ही सफारी घडविली जाणार आहे. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 2 ते 6 अशी वेळ ठरविण्यात आली आहे. सध्या एका वेळी केवळ चार वाहने सोडण्यात येत आहे. मात्र, पर्यटकांचा प्रतिसाद बघता वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ताडोबा वगळता कुठेही सुविधा नाही -

चंद्रपूर जिल्हा हा जंगल आणि जैवविविधतेने नटला आहे. त्यामुळे केवळ ताडोबा नव्हे, तर इतर वनक्षेत्रातदेखील वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. सोबत बिबट, अस्वल, राणकुत्रे, रानगवा, हरण, चितळ, सांबर, रानमांजर यांचीदेखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, इतर वनविभागात वनपर्यटनाची सुविधा नसते. त्यामुळे यासाठी ताडोबामध्येच येऊन पर्यटक या सफारीचा आनंद लुटू शकतात. ताडोबाची ख्याती हळूहळू जगभर पसरली आणि बघता बघता हा परिसर पर्यटकांनी खुलून गेला. रिसॉर्ट, जिप्सीचालक, छोटी दुकाने, गाईड या क्षेत्रात स्थानिकांना रोजगार मिळाला. मात्र, ताडोबा वगळता, अशा सुविधा कुठेही नाही.

स्थानिक रोजगाराला मिळाली चालना -

वनक्षेत्रात कुठलाही उपक्रम सुरू करायचा असल्यास त्याला वनव्यवस्थापन समितीची मान्यता लागते. स्थानिक लोकांना हे अधिकार असतात. या प्रकल्पातदेखील वनव्यवस्थापन समितीचा सहभाग आहे. सध्या या ठिकाणी गाईड म्हणून 10 स्थानिक युवकांना निवडण्यात आले आहे. त्यांचे प्रशिक्षण लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच जिप्सीचालक म्हणूनही स्थानिकांनाच संधी दिली आहे. प्रवेशद्वारापासून गाव अवघ्या काही पावलांवर असून पर्यटकांसाठी होटेल आणि इतर सुविधा उपलब्ध होऊ शकतात.

भविष्याचा विचार करून निर्णय -

वाघांची संख्या कमालीची वाढल्याने जितके वाघ ताडोबात आहेत तेवढेच वाघ ताडोबाबाहेर असलेल्या वनक्षेत्रात आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. ही स्थिती अत्यंत स्फोटक आहे. कारण यातूनच अनेकदा प्राण्यांचा मृत्यू किंवा शिकार करण्यात येते. भविष्यात ही स्थिती आणखी तीव्र होऊ नये यासाठी मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण, उपविभागीय वनाधिकारी अरविंद मुंडे यांच्या पुढाकाराने मध्य चांदा वनक्षेत्रात एक अभिनव प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताडोबा पर्यटनासाठी चांगला पर्याय -

प्रादेशिक विभागात देशात कुठेही पर्यटन सफारी होत नाही. मात्र, चंद्रपुरात ती होऊ शकते कारण येथे जैवविविधता आहे. तसेच वाघाचा वावर असल्याने जैवविविधतेचे संतुलनदेखील बनून आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. मध्यचांदा विभागातील कारवा गावाला लागून असलेल्या रोपवाटिका क्षेत्रातून ही पर्यटन सफारी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. जंगलात गस्त घालता यावी, तसेच अन्य सोयीसाठी प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये बैलगाडी जाण्यापुरती छोटीशी वाट असते. याच रस्त्याला तयार करून 12 किलोमीटरचा परीघ निर्माण करण्यात आला. दोन्ही बाजूला जंगल असल्याने येथे प्राण्यांचे दर्शन होण्याची दाट शक्यता असते. मागील दोन दिवसांत पर्यटकांना वाघ, बिबट, रानकुत्रे, हरण, सांबर, रानगवा यांचे दर्शन झाले. त्यामुळे या प्रकल्पाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भविष्यात ताडोबा पर्यटनाचा हा चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

हेही वाचा - इंडिया जस्टिस रिपोर्ट जाहीर; महाराष्ट्र पुन्हा अव्वल...

ABOUT THE AUTHOR

...view details