चंद्रपूर - घरात आजोबांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरात पाहुण्यांची गर्दी होती. याची संधी साधत चुलत्याने बारा वर्षीय पुतणीवर लैंगिक अत्याचार केला. गोंडपिपरी तालुक्यातील एका गावात काल रात्री हा प्रकार समोर आला.
गोंडपिपरीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात पीडितेच्या आजोबांचे काल निधन झाले. दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी जेवण करण्यास बसले. त्यामुळे कुणाचेही लक्ष नसल्याचे संधी साधून मद्यधुंद चुलत्याने आपल्याच अल्पवयीन पुतणीवर घराच्याबाहेर अत्याचार केला. मुलीचे वडील घराबाहेर निघाले असताना त्यांना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. ते आवाजाच्या दिशेने गेले असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
मुलीची वडिलांनी तिची विचारपूस केली असता काकाने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती तिने घरच्यांना दिली. यापूर्वी देखील आरोपीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. मुलीच्या आईवडिलांनी काल रात्री अकरा वाजता गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गावात जाऊन आरोपीला अटक केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांना गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे, पोलीस हवालदार अनिल चव्हाण, प्रेम चव्हाण यांनी प्रकरणाची माहिती दिली.