चंद्रपूर - बल्लारपुर तालुक्यातील भिवकुंड येथे सैनिकी शाळेच्या बांधकामासाठी न्याती इंजीनिअरिंग अॅन्ड कन्सलटन्सी या कंपनीला बांधकामाचे कंत्राट दिले आहे. कंपनीने स्थानिक कामगारांना कामावर घेतले. परंतु, कित्येक दिवस कंपनीने कामगारांना पगार दिला नाही, असा आरोप उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केला आहे.
बल्लारपूर सैनिकी शाळेतील बांधकाम कामगारांचे आर्थिक शोषण, उलगुलान संघटनेची कारवाईची मागणी - भिवकुंड
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावर घेतले. परंतु, कित्येक दिवस कंपनीने कामगारांना पगार दिला नाही. कामगार पगारासाठी दररोज हेलपाटे घालतात. त्यांना पगार न देता परत पाठविले जात आहे.
कंपनीचे सुपरवायझर जगदिश खेंगर यांच्याद्वारे येथील कामगार काम करायचे. परंतु, या सुपरवायझरचे निधन झाल्यामुळे याच कंपनीतील दुसरे सुपरवायजर एम. डी. सैदुलआलम यांनी कामगारांना पगार मिळवुन देण्याचे सांगितले. पण अजुनपर्यंत या कंपनीने कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला दिला नाही. कामगार पगारासाठी दररोज हेलपाटे घालतात. त्यांना पगार न देता परत पाठविले जात आहे. त्यामुळे सबंधित कामगारांचे मानसिक व आर्थिक शोषण होत असुन कामगारांवर व त्यांच्या कुटुबांवर उपासमारिची पाळी आलेली आहे.
उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांनी प्रशासनाला मध्यस्थी करुन स्थानिक कामगारांचा पगार मिळवुन द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच कामगारांचे शोषण करणाऱया सबंधित कंपनीवर आणि सुपरवायझरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा राजु झोडे, रमेश सोनकर, परमेश्वर नरांजे, राजु वर्मा, संतोष केसकर यांनी दिला आहे.