चंद्रपूर - जिल्ह्यातील जिवती तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने अवघ्या दोन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी 21 वर्षीय नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आकाश पवार असे नराधम आरोपीचे नाव आहे.
संतापजनक! फिरायला नेण्याच्या बहाण्याने २ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
दोन वर्षीय चिमुकलीवर शेतमजूर असलेल्या आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
फिरवण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेले
जिवती तालुक्यातील शेनगाव येथे आरोपी शेतमजूर म्हणून काम करीत होता. शनिवारी या शेतमजुराने पीडित 2 वर्षीय मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून बाहेर नेले. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करून घरी सोडल्यावर कुटुंबियांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. आधी जिवती व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुरडीवर उपचार करण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचंही स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केली. विश्वासाने शेतमजुराकडे सोपवलेल्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे पीडितेचे कुटुंब हादरून गेले आहे. आरोपी आकाश पवार याला याप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.