चंद्रपूर -गटार लाईनची स्वच्छता करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर एक गंभीर असून त्याला नागपुरात हलविण्यात आले आहे. ही घटना राजुरा तालुक्यातील सास्ती कामगार वसाहतीत आज सकाळच्या सुमारास घडली.
धोपटाळा येथील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा कामगार वसाहत परिसरात आज सकाळी 8 ते 10 फूट खोल गटर स्वच्छतेसाठी कामगार उतरले होते. यादरम्यान आतील विषारी वायूमुळे राजू जर्जुला आणि रामजी खंडारकर या कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान वेकोलीच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या घटनेत सुशील कोरडे नामक अन्य बाधित कामगाराला तातडीने नागपुरात हलविण्यात आले आहे. आणखी 2 कामगारांना वायूची किरकोळ बाधा झाली आहे. त्यांच्यावर चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
वेकोली सेफ्टी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा : हंसराज अहीर
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती कोलमाईन्स परिसरातील गटार सफाई करणाऱ्या दोन कंत्राटी कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूस वेकोलिचे सुरक्षा अधिकारी पुर्णतः जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधीत सेफटी अधिकाऱ्यांची सखोल चैकशी करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच अहीर यांनी घटनास्थळी पोहोचुन या अपघाताची माहिती घेतली. वेकोलि अधिकाऱ्यांनी सुरक्षा विषयक बाबींची काळजी न घेतल्याने हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. धोपटाळा काॅलनीतील बंद गटारांमधील गाळ उपसण्यापूर्वी वेकोलि अधिकाऱ्यांनी किंवा संबंधीत कंत्राटदारांनी सुरक्षेबाबत उपाययोजना करणे गरजेचे असतांना याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे गाळ उपसण्यासाठी गेलेल्या कामगाराचा व त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कंत्राटी कामगाराचा नाहक बळी गेला. या दोन्ही कंत्राटी कामगारांचे रेस्क्यु ओपरेशन करतांना वेकोलिचा रेस्क्यु टीम मधील एक कामगार सुध्दा विषारी वायुने बाधीत झाल्याने त्याला नागपुरला रेफर केले असून त्याची प्रकृतीसुध्दा गंभीर असल्याचे समजते.
या रेस्क्यु टीम मधील अन्य दोघांच्या प्रकृतीची हंसराज अहीर यांनी भेट घेतली असता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतू घडलेला एकंदरीत प्रकार अत्यंत गंभीर असल्याने या दुर्घटनेस वेकोलिचे सेफटी अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांचेवर कारवाई होण्याच्या गरजेवर भर देवून या दर्घटनेत मृत पावलेल्या राजु जर्जुला व रामजी खंडारकर या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना तसेच जखमींना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही हंसराज अहीर यांनी घटनास्थळाला भेट देवून केली आहे.