चंद्रपूर :मानव-प्राणी संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपुरात पकडलेल्या दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले आहे. व्याघ्र ट्रान्स्लोकेशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या वाघांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर, 300 हून अधिक कॅमेरे, सुमारे 400 पॅड ठेवण्यात आले आहेत.जिल्ह्यातील मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याच्या उद्देशाने दोन वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले आहे. व्याघ्र ट्रान्स्लोकेशन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चंद्रपुरात नुकत्याच वनविभागाने पकडलेल्या दोन वाघिणींचा यात समावेश आहे. आज शनिवारी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (NNTR) त्यांना सोडण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात प्रथमच वाघांचे कृत्रिम ट्रान्सलोकेशन करण्यात आले आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आज दोन वाघ सोडण्यात आले आहे. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातून या वाघांचे कृत्रिमरित्या स्थलांतर करण्यात आले. या प्रयोगाच्या माध्यमातून वाघांच्या कृत्रिम स्थलांतरावर संशोधन केले जाणार आहे. या वाघांवर नजर ठेवण्यासाठी रेडिओ कॉलर, 300 हून अधिक कॅमेरे, सुमारे 400 पॅड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटन वाढण्यासही मदत होईल - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
वाघ मित्रांना प्रशिक्षण :भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांच्या हस्तांतरणास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज या वाघिणीला नवेगाव-नागझिरा प्रकल्पात हलवण्यात आहे. या ठिकाणी 11 वाघ असून 20 वाघांची अधिवास क्षमता आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा हे वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 400 स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून 100 व्याघ्रमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघ मित्रांना दोन हजार रुपये मानधन दिले जाते. पर्यटकांसाठी सहा अत्याधुनिक वाहने देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
25 वाघांना हलवणार : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR) राज्याच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यात पसरलेले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला की, राज्यातील वाघांचे हे पहिले स्थलांतरण आहे. या "कार्यक्रमांतर्गत, मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी सुमारे 25 वाघांना चंद्रपूर जिल्ह्यातून राज्यातील इतर ठिकाणी स्थलांतरित केले जाईल," असे मुगनंटीवर म्हणाले. वनविभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चंद्रपुरात नुकत्याच दोन वाघिणींना पकडण्यात आले होते.