महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूरच्या लोहारा तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू - chandrapur

रात्रभर या मुलांचा शोध सुरू होता मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह गावालगतच्या तलावात तरंगताना दिसले.

चंद्रपूरच्या लोहारा तलावात दोन विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू

By

Published : Apr 26, 2019, 10:32 AM IST

Updated : Apr 26, 2019, 3:32 PM IST

चंद्रपुर - शहरापासून काही अंतरावर असलेल्या लोहारा गावाजवळच्या तलावात दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज समोर आली. ही मुले कालपासून बेपत्ता होती. अंशु घनश्याम कोडापे आणि रितीक प्रकाश मेश्राम अशी त्यांची नावे आहेत. मुले दिसत नसल्याने त्यांचे पालक आणि गावकरी कालपासून त्यांचा शोध घेत होते. याबाबतची माहिती काल रात्री रामनगर पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. मात्र, अजूनही पोलीस गावात पोचले नाही. आज सकाळी काही लोकांना मुलांचे मृतदेह तलावात तरंगताना दिसून आले.

अंशु आणि रितीक हे काल गावालगत फिरायला गेले होते. मात्र, ते तलावाकडे कसे गेले याची माहिती कोणालाही नाही. लोहारा गावाला लागूनच जंगल परिसर आहे. गावाच्या वेशीलाच तलाव आहे. येथे ही मुले कदाचित पोहण्यासाठी गेले असावीत. या वेळी दोघांचाही बुडून मृत्यू झाला. संध्याकाळ झाली तरी मुले घरी न आल्याने पालकांनी शेजाऱ्यांना विचारपूस केली. मात्र, त्यांचा पत्ता न लागल्याने पालक आणि गावकऱ्यांनी या मुलांचा शोध सुरू केला तसेच याची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. रात्रभर या मुलांचा शोध सुरू होता मात्र त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर आज सकाळी त्यांचे मृतदेह गावालगतच्या तलावात तरंगताना दिसले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पंचनामा करून ते पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे लोहारा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Last Updated : Apr 26, 2019, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details