चंद्रपूर- नेरी वन क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बोडधा नेरी मार्गावर वन्यप्राण्यांची शिकार करून विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून वनक्षेत्राधिकारी पी. एम. डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शिवनपायली मोडीवर दबा धरून बसले होते. शिवनपायली येथील खवय्ये सांबराचे मांस खरेदी करून दुचाकीवरुन येत असताना दुचाकीसह त्यांना अटक करण्यात आली, तर मुख्य सुत्रधार मांस विक्री करणारा अद्याप फरार असून वन व पोलीस विभागाकडून त्याचा शोध सुरू आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी असल्याचा फायदा तालुक्यातील वन्य प्राणी शिकारी घेत आहेत. शिकार केलेले मांस लपून छपून खास खवैय्यांना विक्री करून शिकारी पैसा कमावित आहेत. यावर प्रतिबंध घालण्याकरिता वन विभागातर्फे पेट्रोलिंग केले जात आहे व अंतर्गत स्त्रोत मजबूत करण्यात येत आहेत. अशाच गोपनीय सुत्रांकडून बोडधा शेतशिवारात सांबराची विक्री केली जात असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्याआधारे नेरी वनक्षेत्राधिकारी पी.एम.डांगे यांच्या मार्गदर्शनात वनविभागाचे पथक बोडधा ते नेरी रस्त्यावरील,मौजा शिवणपायली मोड रस्त्यावर सकाळच्यादरम्यान दबा धरून बसले होते.