चंद्रपूर - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडले आहे. आशय उराडे आणि प्रदीप गणवीर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई गांधी चौक जवळील पुगलीया गल्ली येथे आज दुपारच्या सुमारास करण्यात आली. हे दोघे प्रत्येकी 25 हजार रुपयाला इंजेक्शन विकणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली होती. त्यानंतर अन्न व औषध विभाग व शहर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय -
सध्या कोरोना महामारीत आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे चित्र आहे. रुग्णांना बेडदेखील मिळत नाही. जे रुग्ण गंभीर आहेत त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असते. पूर्वी ही यंत्रणा या औषधाच्या वितरकांकडे होती. त्यात अनेकांना हे इंजेक्शन मिळत नव्हती. ही संपूर्ण प्रणाली संशयास्पद होती. त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीदेखील रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात होत्या. त्यानंतर ही यंत्रणा जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात गेली. मात्र, असे असतानादेखील रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे रॅकेट सक्रिय आहे, हे आता प्रशासनाने केलेल्या करवाईतून समोर आले आहे.
हेही वाचा- लॉकडाऊनच्या धसक्याने सोलापुरात खरेदीसाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा