चंद्रपूर - वाशिम जिल्ह्यातून मूल येथे ट्रकमधून होणारी दारू तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे. विशेष म्हणजे जनावरांच्या चाऱ्यात दारू लपवून दारूची वाहतूक करण्यात येत होती. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावर घंटाचौकीजवळ करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे 37 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नकिब खान अमनुल्ला खान आणि मोहम्मद अब्दुल मोहम्मद सलीम अशी या आरोपींची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचा निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने दारू तस्करी व अन्य अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी आठ पथके तयार केली आहेत. या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर लक्ष ठेवले जात आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून, एमएच २९ एएन २४४४ क्रमांकाच्या ट्रकद्वारे मूल येथील प्रफुल्ल दिलोजवार याच्याकडे दारूचा पुरवठा होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर जमीर खान पठाण, मिलिंद चव्हाण, अनूप डांगे, राजेंद्र खनके, जावेद सिद्दीकी, नितीन जाधव, संदीप कापडे यांच्या पथकाने चंद्रपूर-मूल मार्गावर नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू केली. एमएच २९ एएन २४४४ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता, गुराच्या चाऱ्यात देशीदारूचा साठा लपवून ठेवला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तेथून देशी दारूच्या ७० पेट्या व ट्रक जप्त केला.