चंद्रपूर -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात 28 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये अवघ्या नऊ दिवसांची चिमुकली आणि तिच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 495 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 311 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३४ वर्षीय पुरुष आणि ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. तसेच राजुरा पोलीस ठाण्यातील ४६ वर्षीय जवान पॉझिटिव्ह आढळला आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील हा जवान असल्याचे समजते. राजुरा येथील तेलंगणा राज्यातून प्रवास केलेली 19 वर्षीय युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील 24 वर्षीय पुरुषही बाधित आढळला आहे. चेन्नई येथून या ठिकाणी आलेल्या यापूर्वीच्या एक बाधिताच्या संपर्कात हा युवक आलेला आहे. तसेच नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 21 वर्षीय युवक बाधित आढळला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. यासोबतच चंद्रपूर शहरातील पठाणपुरा सावरी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. ब्रह्मपुरी येथील कुडेसाघली 24 वर्षीय पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह आढळला.