चंद्रपूर- राजुरा येथील इन्फंट जिझस कॉन्व्हेंट इंग्लिश शाळेच्या अदिवासी वसतिगृहात मुलींचे लैगिंक शोषण झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणातील शोषण झालेल्या पीडीत मुलींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. तर आज या प्रकरणात पोलिसांनी आणखी २ महिलांना अटक केली आहे.
आदिवासी वसतिगृहातील मुलींचे लैंगिक शोषण प्रकरणी माहिती देताना पोलीस आणि आमचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर
इन्फंट जिझस कॉन्व्हेंट येथील वसतिगृहातील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी २ मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात ही बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात आता विविध संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
काल सोमवारपर्यंत या प्रकरणात २ जणांना अटक करण्यात आली असून त्यात वसतिगृह अधीक्षक छबन पचारे, सहाय्यक अधीक्षक नरेंद्र विरुटकर, असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवि कलम ३७६ (अ) (ब) सहकलम ४, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच अट्रॉसीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही संस्थेने बडतर्फ केले आहे.
विशेष बाब म्हणजे, आज या प्रकरणात आणखी २ जणांना अटक करण्यात आली आहे. कल्पना ठाकरे आणि लता कन्नाके, असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदारांची संख्या वाढली असून आज ४ मुलींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासात आणखी आरोपींना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
असे आहे प्रकरण, असा केला जात होता अत्याचार -
राजुरा येथील आदिवासी वसतीगृहातील मुलींना पाण्यातून ओआरएस पावडर दिली जात होती. त्यात गुंगीचे औषध टाकले जात होते. यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होता. मुली बेशुद्ध पडल्या की त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचार करून परत आणल्या जात होते. ६ एप्रिलला १३ मुलीं बेशुद्ध पडल्या. यापैकी २ मुलींची तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्यांना चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.