चंद्रपूर- राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभेचे मतदान होत आहे. याच दिवशी क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालू, असा इशारा आदिवासी समाजाच्या जागतिक गोंड सगा मांदी या संघटनेने दिला आहे.
शहीद वीर बाबुराव शेडमाके हे क्रांतिकारक होते. इंग्रजांनी त्यांना 21 ऑक्टोबर 1857 ला चंद्रपूर येथील कारागृहात फासावर लटकविले होते. तेव्हापासून या दिवशी लाखो आदिवासी बांधव या स्थळी नमन करण्यासाठी येतात. मात्र, याच दिवशी निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केली आहे. यावर आदिवासी समाजाने आक्षेप घेतला आहे. या दिवशी मतदान घेऊ नये, त्यात बदल करण्यात यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.