महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिमूर शहराजवळ वाघाची दहशत, एका आठवड्यात २ गायींचा फडशा

चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या केसलापूर तळोधी(नाईक) येथे वाघाने एक गाय ठार मारल्याची घटना घडली. चिमूर शहराच्या अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावर वाघाने एका आठवड्यात दोन गायींचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चिमूर शहराजवळ वाघाची दहशत
चिमूर शहराजवळ वाघाची दहशत

By

Published : Jan 31, 2020, 12:28 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या केसलापूर तळोधी(नाईक) येथील शंकर नत्थुजी तडवेकर यांचे शेतातील गोठ्यात बांधलेल्या गाभण गायीला वाघाने ठार मारल्याची घटना घडली. पहाटे ६ वाजता तडवेकर शेतात गेले असता ही बाब उघडकीस आली. चिमूर शहराच्या अवघ्या एक ते दीड किमी अंतरावर वाघाने एका आठवड्यात दोन गायींचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

चिमूर शहराजवळ वाघाची दहशत

चिमूर नगरपरिषद क्षेत्राजवळ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र असल्याने या हंगामात वाघ-बिबट या क्षेत्रातील शेत शिवारात येऊन जनावरांना ठार करतात. २३ जानेवारीला कवडशी (रोडी) लगत असलेल्या बोरगाव (रिठी) शेत शिवारातील पुरुषोत्तम नन्नावरे यांच्या गोठ्याला वाघाने भगदाड पाडून गाय ठार मारली होती. चिमूर शहरात राहणारे शंकर तळवेकर यांचे नगरपरिषद क्षेत्रातीलच केसलापूर तडोधी रोडवर असलेल्या शेतात गोठा आहे. या गोठ्यात ते गायी, बैल बांधून ठेवतात आणि रोज रात्री जेवण करून झोपायला येतात. २९ जानेवारीला ते बकऱ्या विकायला बाहेर गावावरुन उशिरा आल्याने घरीच झोपले.

हेही वाचा - लॉयड मेटल कारखान्यात पुन्हा एका कामगाराचा मृत्यू, पंधरा दिवसातील दुसरी घटना

शंकर नित्यनियमाने पहाटे शेतातील गोठ्यात जनावरांना चारा पाण्याला सोडण्यासाठी गेले असता त्यांना गाभण गाय मरून दिसली. गोठ्याच्या आजूबाजूला वाघाच्या पंजांचे ठसे दिसून आल्यामुळे या गायीला वाघानेच ठार मारल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची सूचना वन विभागाला देण्यात आली आहे. गरीब शेतकऱ्याची गाभण गाय ठार झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून वन विभागाने तातडीने नुकसानभरपाई देऊन सहाय्य करण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

हेही वाचा - वेकोली परिसरात अस्वलाचा वावर; वनविभागाने लावले पिटाळून

ABOUT THE AUTHOR

...view details