चंद्रपूर - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे बिबट्याची दहशत असतानाच मुरमाडी येथे पट्टेदार वाघाने एकाचा बळी घेतला. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह उचलायला नकार दिला. दुपारपर्यंतही तणावाची स्थिती कायम होती. अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनानंतर गावकऱ्यांना भेट देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर मृतदेह उचलण्याता आला.
वनमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर मृतदेह उचलला, सिंदेवाही तालुक्यात वाघाचा तिसरा बळी - सिंदेवाही तालुक्यात वाघाचा तिसरा बळी
सिंदेवाही तालुक्याच्या मुरमाडी येथे वाघाने आठवड्यात तिसरा बळी घेतला. पालकमंत्री घटनास्थळाला भेट देऊन कारवाईचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली आहे.
सिंदेवाही तालुक्याच्या गावापासून अवघ्या ५ किलोमीटरवर असलेल्या मुरमाडी येथे वाघाने तिसरा बळी घेतला. रविवारी सायंकाळच्या सुमारास गुरे चराई करून जंगलातून परतणाऱ्या तुळशीराम पेंदाम (वय ६५) यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि दूरवर फरफटत नेऊन मारले. गेल्या आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी याच तालुक्यातील गडबोरी येथे बिबट्याने दोन जणांचा बळी घेतला. मुरमाडी येथील घटनेनंतर लोकांमध्ये रोष आहे. पालकमंत्री घटनास्थळाला भेट देऊन थेट कारवाईचे आदेश देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका लोकांनी घेतली आहे.
घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या गावाला श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी भेट देत गावकऱ्यांशी चर्चा केली. गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गोस्वामी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. अधिवेशनानंतर गावाला भेट देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतरच मृतदेह उचलण्यात आला. पण, जर भेट दिली नाही तर वनविभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकू, असा इशारा गावकऱयांनी दिला आहे.