चंद्रपूर - नागभीड तालुक्यातील बामणी या गावातील एका झोपडीत चक्क वाघ दिसून आला. यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सध्या या वाघाने या गावात धुमाकूळ घातला आहे. यात एक जण जखमी झाला आहे. घटनास्थळी वनविभाग आणि पोलीस प्रशासन पोहोचले आहे. वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
नागभीड तालुका हा जंगलाने वेढला असल्याने येथे हिंस्र प्राण्यांचा वावर दिसून येतो. हे प्राणी अनेकदा गावातही शिरकाव करतात. याच प्रकारची पुनरावृत्ती आज (रविवारी) झाली. नागभीड तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी गावात एक पट्टेदार वाघ चक्क झोपडीत दिसून आला. श्रीकांत देशमुख यांच्या झोपडीत हा वाघ दडून बसला होता. त्यांना ही बाब लक्षात आल्यावर धक्काच बसला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर गावकऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत गावकऱ्यांनी वाघाला बघण्यासाठी एकच गर्दी केली.