चंद्रपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशाला संविधान मिळाले त्या संविधान निर्मात्याचाच महानगरपालिकेला विसर पडला आहे. म्हणून शहरात अन्य राष्ट्रपुरुषांच्या स्वच्छता आणि सजावट होत असतानाच आंबेडकरांचा पुतळा मात्र यापासून दुर्लक्षित होता. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यानंतर अखेर मनपाला जाग आली आणि रात्री साडे दहा वाजता पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. ज्यांनी संविधान निर्माण केले त्यांचाच विसर मनपाला पडणे ही लाजिरवाणी बाब असल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.
चंद्रपूर महापालिकेला प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्याचाच विसर हेही वाचा - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट, दिल्ली विमानतळ राहणार 2 तास बंद
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय पुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता करून सजावट केली जाते. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारीला प्रियदर्शनी चौकातील इंदिरा गांधी, जटपुरा गेटवरील महात्मा गांधी यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच गांधी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून सजावट करण्यात आली. मात्र, शहरातील मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कुठलीही स्वच्छता, सजावट मानपाकडून करण्यात आली नसल्याची बाब रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथागत पेटकर यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ मनपा आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अखेर पेटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देताच मनपा प्रशासनाला जाग आली. आणि मध्यरात्री त्यांनी हे काम सुरू केले. ज्या बाबासाहेबांमुळे देशाला संविधान मिळाले त्याच राष्ट्रपुरुषाचा प्रजासत्ताक दिनी मनपाला विसर पडतो ही अत्यंत लाजिरवाणी बाब पेटकर म्हणाले.
हेही वाचा - घटनात्मक प्रजासत्ताक राष्ट्राची मूल्ये आठवताना...