चंद्रपूर: बार्टीच्या युक्ती मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचे मानधन जाणीवपूर्वक रोखल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. यात बायोमेट्रिक मशीनमध्ये घोळ Disruption in Biometric Machine करण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेरे हे नाममात्र असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ईटीव्ही भारतने या केंद्राची पाहणी केली असता, अनेक कॅमेरे बंद अवस्थेत किंवा त्यात बिघाड असलेले आढळले. त्याचा नियमित बॅकअप देखील घेतला जात नव्हता. बायोमेट्रिक मशीन ही बाहेर काढून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. जर सीसीटीव्ही कॅमेरेच कागदावर असतील तर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती की नाही ? याची शहानिशा करण्याची कुठलीही यंत्रणा व्यवस्थापनाकडे नाही. असे असले तरी युक्ती मल्टिपर्पज सोसायटी केंद्राचे व्यवस्थापन मात्र यावर सारवासारव करत सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा करीत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. हा प्रकार गंभीर असल्याने याप्रकरणाची बार्टी संस्थेकडून सखोल चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
मोठा आर्थिक घोळअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. ही स्वायत्त संस्था शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येते. या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असून विद्यार्थ्यांना दर मही 6 हजार याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो. चंद्रपुरात हे प्रशिक्षण केंद्र चोर खिडकी जवळील युक्ती मल्टीपर्पस सोसायटीला देण्यात आलेले आहे. मात्र येथे मोठा आर्थिक घोळ होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून वारंवार प्राप्त होत आहेत. फेब्रुवारी ते ऑगस्ट यादरम्यान झालेल्या प्रशिक्षण वर्गातील 150 पैकी 35 जणांना गैरहजर असल्याचे दाखवून त्यांचे मानधन रोखण्यात आलेले आहे. युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या संचालिका अनुपमा नगरकर भुजाडे यांच्या मर्जी न राखल्याने त्यांच्यावर असा अन्याय करण्यात आला असा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी लावला आहे.
बायोमेट्रिक एकीकडे कॅमेरा दुसरीकडेया प्रशिक्षण केंद्रामध्ये येणारे विद्यार्थी नियमितपणे बायोमेट्रिक मशीनवर आपली हजेरी लावतात की नाही किंवा हजर असतात की नाही. हे बघण्यासाठी बायोमेट्रिक मशीनची जागा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसण्याची व्यवस्था हवी. मात्र त्या दृष्टीने कुठलेही प्रयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे जे विद्यार्थी हजर असूनही गैरहजेरी लावली असल्याचा आरोप करत आहे. त्यांचा हा दावा खोडून काढण्यासाठी युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या व्यवस्थापनाकडे कुठलाही पुरावा नाही.
विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरकुठल्याही ठिकाणी काही गैरप्रकार किंवा अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास त्याचा पुरावा असावा. या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. मात्र ईटीव्ही भारतने 5 ऑक्टोबरला या केंद्राला भेट दिली असता. केवळ शिक्षक वर्ग आणि कार्यालय याव्यतिरिक्त कॅमेरे हे बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे कॅमेरे असेच बंद पडून होते. मात्र व्यवस्थापनाकडून आत्ताच पाऊस आल्यामुळे हे कॅमेरे बिघडले असल्याचे कारण सांगण्यात आले. विशेष म्हणजे याच युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या नागपूर येथील केंद्रात एका शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची तक्रार झाली आहे. विद्यार्थ्यासह विद्यार्थिनी देखील येथे आहेत. महिलासुरक्षा हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. असे असताना सीसीटीव्ही बंद असणे ही गंभीर बाब आहे.
सीसीटीव्ही बंद असताना काही अनुचित प्रकार घडला असता. तो कळायला कुठलाही मार्ग नाही. यावर संचालिका नगरकर यांनी असे काही घडल्यास ती सर्व जबाबदारी आपली असल्याचे सांगितले आहे. मात्र कोणी तोंडी आश्वासन दिल्याने असे प्रकार होणार नाहीत, याची कुठलीही शाश्वती नाही. त्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि तंत्रज्ञान हे महत्वाचे असते.