चंद्रपूर- कोरोनामुळे सुरू असलेल्या जमावबंदीचा फायदा घेत चोरट्यांनी एका दुकानावर डल्ला मारला. या चोरट्यांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
चोरट्यांनी साधली जमावबंदीची संधी, पोलिसांनीही ठोकल्या 24 तासात बेड्या
कोरोनामुळे सुरू असलेल्या जमावबंदीचा फायदा घेत चोरट्यांनी एका दुकानावर डल्ला मारला. या चोरट्यांना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या.
अब्दुल रज्जाक अली यांचे बागला चौक येथे किराणा दुकान आहे. मंगळवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेले असता, त्यांना दुकानाचे कुलूप तसेच दरवाजे तुटले असल्याचे आढळले. आत जाऊन बघितले असता दुकानांच्या गल्ल्यातील सर्व नाणी चोरट्यांनी लंपास केली होती. 23 हजार 650 रुपये चोरट्यांनी पळवले असल्याचे लक्षात आले. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला.
गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. यादरम्यान महावीरनगर, भिवापूर वार्डातील संशयित आरोपीचा शोध घेऊन विचारपूस केली असता हेच संशयित आरोपी निघाले. संदीप चौधरी, इरफान शेख, तनवीर बेग अशी या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशील कोडापे, सहायक उपनिरीक्षक बाबा डोमकावळे, हवालदार वंदीराम पाल, किशोर तुमराम, विलास निकोडे, स्वामीदास चालेकर, महेंद्र बेसरकर, सिद्धार्थ रंगारी यांनी केली.