चंद्रपूर- पावसाळ्याचा दुसरा महिना लोटत चालला असताना चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस बरसलेला नाही. परिणामी शेतातील कपाशी, भात पीक करपू लागले आहे. या अस्मानी संकटातून पिकांना वाचवण्यासाठी बळीराजाने पारंपरिक पद्धतीने देवाला साकडं घातले. देवाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण गावाने वाजतगाजत देवाळात जाऊन पाऊस पडवा म्हणून प्रार्थना केली.
चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिंपरी तालुक्यात धाबा या गावी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी देवाची पूजा करण्यात आली. पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला, मात्र पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही पीक हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कसेबसे स्वतःला सावरत मोठ्या हिमतीने बळीराजाने शेती उभी केली. पावसाळ्यात दमदार पाऊस बरसणार, असे भाकित हवामान खात्याने वर्तवले होते. यामुळे मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र पावसाने दगा दिला. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. शेतात पाण्याचा थेंबही साचलेला नाही. त्यात सूर्य आग ओकत आहे. यामुळे शेतातील कोवळी कपाशी, भाताचे पीक करपू लागले आहे.