चंद्रपूर - वरोरा वनपक्षेत्रात एक वाघीण गळ्यात फास असताना फिरताना वनविभागाच्या निदर्शनास आली. या वाघिणीचा शोध सध्या युद्धस्तरावर सुरू आहे. या वाघिणीच्या शोधासाठी परिसरात 45 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तिचा मागमूस विशेष शोधपथक घेत आहे. या परिसरात तीन ठिकाणी वाघिणीसाठी शिकार ठेवण्यात आली आहे. तर, ती लवकर दिसावी यासाठी अनेक ठिकाणी मचाणीसुद्धा उभारण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आजच ह्या वाघिणीच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. त्यामुळे ही वाघीण सुखरूप असल्याचा विश्वास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वाघीण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद
वरोरा वनपरिक्षेत्र असलेल्या सालोरी बिट मध्ये काही दिवसांपूर्वी एक वाघीण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली. त्यात तिच्या गळ्याभोवती फास असल्याने एकच खळबळ उडाली. हा फास तृणभक्षी शिकारीसाठी लावण्यात आला अशी शक्यता असली, तरी हा गंभीर प्रकार आहे. या वाघिणीच्या गळ्यात फास असल्याने तो आवळला गेल्यास तिचा मृत्यू देखील होण्याची भीती आहे. त्यानुसार ही माहिती संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार ह्या वाघिणीचा शोध सुरू झाला. ह्या वाघिणीच्या गळ्यातील फास काढणे अपेक्षित आहे. मात्र, मागील पाच दिवसांपासून ही वाघीण शोध पथकाला हुलकावणी देत आहे. तिच्या शोधासाठी जागोजागी 45 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. सोबत तिला आकर्षीत करण्यासाठी तीन ठिकाणी शिकार म्हणून, जनावरे देखील ठेवण्यात आले आहेत. सोबत काही मोक्याच्या ठिकाणी मचाणी देखील उभारण्यात आल्या आहेत. सोबत शोधपथक ह्या वाघिणीचा मागमूस घेत आहे. ह्या वाघिणीच्या अनेक ठिकाणी पाऊलखुणा आढळून येत आहेत. आजच तिच्या ताज्या पाऊलखुणा परिसरात आढळून आल्या आहेत.
वाघिणीने शिकार देखील केली आहे
काही दिवसांपूर्वी ह्या वाघिणीने शिकार देखील केली आहे. तिची विष्टा काही ठिकाणी आढळून येत आहे. याचाच अर्थ ती वाघीण सुरक्षित आहे आणि सध्या तरी तो फास अजून जीवघेणा ठरला नाही. त्या वाघिणीची ओळख तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. ओळखिची खात्री पटली त्यानंतरच पुढील योजना आखण्यात येईल. ती वाघीण लवकरात लवकर निदर्शनास येवो यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. वाघीण सध्या सुरक्षित आहे. तिचा शोध वरोरा वनपरिक्षेत्र विभागाची टीम घेत आहे. तीन ठिकानी शिकार ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, याच परिसरात पिलं असलेली वाघीण आणि बिबट असल्याने पिंजरा लावता येणार नाही. ही वाघीण अन्य ठिकाणी स्थलांतरीत होऊ नये हे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिचा शोध घेणे गरजेचे आहे. एकदा तिचे नेमके स्थान सापाडले, तर पूढे तिला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया योग्यरीत्या करता येईल, असे उपवनसंरक्षक सरिता जगताप यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.