चंद्रपूर- शहरात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लाक्षणीय असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने भाडेकरूंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये घरभाडे किमान तीन महिने पुढे ढकलण्याचे तसेच कोणत्याही भाडेकरूंना घरामधून न काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी गृहनिर्माण विभागाच्या सूचनेनुसार दिले आहेत.
सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात 23 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झालेला असुन अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे.