चंद्रपूर -येथे बाहेरून आलेल्या अधिकाऱ्याच्या सोयीसाठी चक्क शासकीय कार्यालयच 'होम क्वाररंटाईन' करण्यात आले. कृषी विभागाशी संलग्नित आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात हा प्रकार घडला. ही बाब 'ईटीव्ही भारत'ने निदर्शनास आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. अखेर त्या अधिकाऱ्याची रवानगी आता संस्थात्मक अलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. सोबतच त्याची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. रेडझोनमध्ये जाणे आणि येण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. येथून विनापरवानगी प्रवास करणाऱ्यांना विलगीकरणात ठेवले जाते. मात्र, एका अधिकाऱ्याच्या सोयीसाठी चक्क 'आत्मा' प्रकल्प संचालक कार्यालय वेठीस धरण्यात आले. येथील एक अधिकारी नागपूरवरून परतले. तेव्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती मनपाला दिली. मात्र, त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात पाठविण्याऐवजी आत्मा कार्यालयालाच 'होम क्वारंटाईन' केंद्र घोषित करण्यात आले. मनपाचे कर्मचारी तसा शिक्काही मारून गेले. त्यांना १८ जूनपर्यंत विलगीकरण करण्यात आले असून कुणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी येणे बंद केले आहे. साहेबांच्या व्यवस्थेत एक शिपाई मात्र होते.
कार्यालयात कुठलीही निवासाची व्यवस्था किंवा घर नसताना हे अधिकारी 'होम क्वारंटाईन' कसे ह्या प्रश्नाचा जराही विचार न करता ही व्यवस्था अधिकाऱ्याला करून देण्यात आली. तसेच त्याठिकाणी हे अधिकारी एकटेच थांबत असल्याचा देखावा निर्माण करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ते तिथे राहतच नव्हते अशी माहिती आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे, त्यांचे गट स्थापन करण्याची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. मात्र, यादरम्यान ही सर्व कामे ठप्प होती. हे सर्व एका अधिकाऱ्यासाठी करण्यात आले. मात्र, ही बातमी 'ईटीव्ही भारत'मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे झाले. यानंतर ह्या अधिकाऱ्याची रवानगी आता संस्थात्मक अलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. तसेच या नाट्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांची कोरोनाची चाचणीसुद्धा करण्यात आली आहे.
मग संपूर्ण कार्यालय 'होम क्वारंटाईन' का?
प्रशासकीय अधिकारी जे सेवेत रुजू आहेत. त्यांना येण्याजाण्याची रीतसर परवानगी देण्यात आली आहे. तसेच त्यांना विलगीकरण कक्षात राहण्याची आवश्यकता नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच हे अधिकारी बाहेरून कार्यालयात आल्यावर त्यांनी स्वतःहून विलगीकरण कक्षाची मागणी केली असे सांगण्यात येते. मग असे असले तर त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवायला हवे होते. मात्र, तसे न करता संपूर्ण कार्यालय वेठीस धरण्यात आले.