राजूरा ( चंद्रपूर ) - गोंडपिपरी तालुक्यातील विविध घाटातून वाळू चोरी सुरू आहे. नवनियुक्त तहसिलदारांनी पदभार स्विकारताच वाळू तस्करांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर मालकाला एक लाख नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नवनियुक्त तहसिलदारांचा वाळू तस्कराला दणका; १ लाख ९ हजारांचा ठोठावला दंड - राजूरा तहसील न्यूज
ट्रॅक्टर मालकावर एक लाख नऊ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती तहसिलदार के. डी. मेश्राम यांनी दिली. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील वाळुचा दर्जा उत्तम असल्याने येथील वाळुला जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर मोठी मागणी आहे. सध्या वाळू घाटांचे लिलाव रखडले आहेत. त्यामुळे वाळू चोरी करण्यासाठी तालुक्यात तस्करांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. येथे दिवसाढवळ्या वाळुची चोरी राजरोसपणे सुरू आहे.
गोंडपिपरी तहसिल कार्यालयाचा नुकताच पदभार स्विकारलेले के. डी. मेश्राम यांनी वाळू तस्करांविरोधात मोहीम उघडली आहे. तालुक्यातील येनबोथला येथील वैनगंगा नदी घाटावरून वाळुची चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला महसूल विभागाच्या पथकाने पकडले. हा ट्रॅक्टर संतोष आनंद बट्टे यांच्या मालकीचा आहे. ट्रॅक्टर मालकावर एक लाख नऊ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आल्याची माहिती तहसिलदार के. डी. मेश्राम यांनी दिली. वाळू चोर राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने कार्यवाही करताना महसूल विभागाने कारवाईत हात आखडता घेतला होता. मात्र, या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.