महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॉन्व्हेंटच्या शुल्कासाठी चिमुकल्याला वर्गखोलीत डांबले, पालकांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील कॉन्व्हेंटमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्याला खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप संबंधित मुलाच्या पालकांनी केला आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पालकांसोबत चिमुकला विद्यार्थी

By

Published : Nov 21, 2019, 8:06 AM IST

चंद्रपूर -जिल्ह्यातील शंकरपूर येथे कॉन्व्हेंटचे शुल्क न भरल्याने पालकासमोर चिमुकल्या मुलाला वर्गखोलीत डांबल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

कॉन्वेटच्या शुल्कासाठी चिमुकल्याला वर्गखोलीत डांबले

सध्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे लोन ग्रामीण भागात देखील पोहोचले आहे. त्यामुळे पात्रता नसताना देखील कॉन्व्हेंटची दुकानदारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र, त्यानंतर शुल्कासाठी तगादा लावला जातो. असाच प्रकार शंकरपुरातील गॅलक्सी कॉन्व्हेंटमध्ये घडला आहे. चिचाळा येथील प्रणय चौधरी हे नोकरीनिमित्त गुजरातमध्ये राहतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय चिचाळा येथे राहते. त्यांनी त्यांच्या मुलाला शंकरपूर येथील गॅलक्सी कॉन्व्हेंटमध्ये केजी २ मध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीला काही शुल्क दिले. त्यानंतर उर्वरीत शुल्क दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने देणे बाकी होते. त्यासाठी चिमुकल्या मुलाला वर्गातच विचारले जात होते. तसेच ४ दिवसांपूर्वी आजोबा त्या मुलाला घेण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये गेले असता, शुल्क भरल्याशिवाय तुम्हाला मुलाला नेता येणार नाही म्हणत त्याला खोलीत डांबून ठेवले, असे आरोप त्या चिमुकल्या मुलाच्या कुटुंबीयांनी केले आहेत.

येत्या २ ते ३ दिवसात शुल्क जमा करतो. मात्र, त्या चिमुकल्याला सोडा अशी विनंती केली. तरीही कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका या उद्धटपणे बोलत होत्या, असाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी प्रणय चौधरी मुलाची प्रगती विचारण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये गेले होते. त्यावेळी आम्हाला असे प्रश्न विचारू नका. आम्ही मुलांना बरोबर शिकवतो. तुम्हाला पटत नसेल तर आपल्या मुलाला परत घेऊन जा, असे उद्धटपणे बोलले असल्याचा आरोप देखील त्या चिमुकल्याचा वडिलांनी केला आहे. यासंदर्भात चिमूर येथील गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

दरम्यान, आम्ही कॉन्व्हेंट प्रशासनासोबत संपर्क साधला असता, असा कुठलाही प्रकार आमच्या कॉन्व्हेंटमध्ये घडला नसल्याची माहिती मुख्याध्यापिका यांनी दिली.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details