चंद्रपूर- संस्थात्मक विलगीकरण कक्षात नको त्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आता गुरुजींची मदत घेतली आहे. आजपासून (गुरुवार) विलगीकरण इमारतीत असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तीन पाळीमध्ये शिक्षक कर्तव्य बजावणार आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत, 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 3 शिक्षक दररोज पहारा देणार आहेत.
विलगीकरण कक्षावर आता 'गुरुजींची पाळत...
चंद्रपूर जिल्ह्यात विलगीकरण इमारतीत असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तीन पाळीमध्ये शिक्षक कर्तव्य बजावणार आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देश टाळेबंद झाला आहे. बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींना गावाबाहेर संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. विलगीकरण कक्षात नको त्या घटना घडल्याचे प्रकार पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी शैक्षणिक संस्थेच्या शिक्षकांना कामाला लावले आहे. आजपासून संस्थात्मक विलगीकरण असलेल्या व्यक्तींवर गुरुजींची नजर असणार आहे. तीन पाळीमध्ये वेगवेगळे शिक्षक कर्तव्य बजावणार आहेत. पहाटे 6 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत, 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत तर रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत शिक्षक पहारा देणार आहे.
गोंडपिपरी तालुक्यात एकूण 36 संस्थात्मक विलगीकरण केंद्रात 216 शिक्षक आजपासून कर्तव्य बजावीत आहेत. जिल्ह्यातील जिवती, गोंडपिपरी, चिमूर, पोंभुर्णा, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यात राबाविला जात आहे. या तालुक्यात जवळपास शेकडो शिक्षक पहारा देत आहेत.