चंद्रपूर -क्रिडा स्पर्धेसाठी गेलेल्या ४६ विद्यार्थ्यांना एकाच टेम्पोत बसवून क्रीडा स्पर्धेसाठी नेल्याची धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे घडली आहे. हे विद्यार्थी सकमूर येथे क्रिडा स्पर्धेसाठी गेले होते. विषेश म्हणजे स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांसोबत गेलेले शिक्षक मात्र मागून स्वत:च्या गाडीने येत होते.
शिक्षकाने एका टेम्पोत बसवले ४६ विद्यार्थी बसण्यासाठी जागाच नसल्याने हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून चक्क लोंबकळत प्रवास करत होते. गोंडपिपरी तालुक्यातच काही दिवसांपूर्वी भंगारपेठ येथे कर्तव्यावर असलेला शिक्षक दारू पिऊन शाळेजवळ पडल्याची संतापजनक घटना समोर आली होती. त्यानंतर आता या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
हेही वाचा -फुल्ल ढोसून झोपले तळीराम गुरुजी; विद्यार्थ्यांची पाटी राहिली कोरी
याप्रकरणी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत केंद्रप्रमुख काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मात्र याविषयी काहीच माहीती नसल्याचे म्हटले आहे.
गोजोली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले, "तीन दिवसांपासून विद्यार्थी सकमुरला होते. त्यांना नेण्यासाठी ठरवलेले वाहन आले नाही. तसेच बस आणि इतर वाहनही वेळेवर मिळाले नाही. अशावेळी माझ्या ओळखीच्या रस्त्याने जाणाऱ्या टेम्पोला थांबवून त्यामध्ये 20 विद्यार्थ्यांना मी बसायला सांगितले. मात्र, घराकडे जाण्याची घाई असल्याने उर्वरित विद्यार्थीही टेम्पोत बसले. तसेच माझ्या मोटारसायकलीवरही मी काही विद्यार्थ्यांना नेले." वेळेवर वाहन न आल्याने विद्यार्थ्यांना टेम्पोने आणावे लागले असल्याचे स्पष्टीकरण शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिले आहे.