चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ( Tadoba Tiger Reserve ) पर्यटकांनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे स्थानिक रोजगाराला मोठा फटका बसला. याबाबत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, माजी अर्थमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungatiwar ) यांनी हा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी केली होती. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून उद्या 2 फेब्रुवारीपासून ( Tadoba Tiger Reserve Open For Tourism ) हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला होणार आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती मागणी -
राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने ताडोबा सफारी बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. या निर्बंधांची नवी सुधारित नियमावली राज्य सरकारने 11 जानेवारी २०२१ रोजी जाहीर केली होती. ताडोबाच्या पर्यटनावर रिसोर्ट, हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, जिप्सीचालक, मालक, गाईड, सर्वसाधारण कामगार, मजूर इत्यादिंचा उदरनिर्वाह चालतो. कोरोना महामारीमध्ये सतत दोन वर्षे लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थितीने लाखो कुटुंबे होरपळून निघत आहेत. थोडी फार रोजगाराची सुरुवात झाल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. पुन्हा हा प्रकल्प बंद झाल्याने स्थानिक रोजगाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय इतर राज्यातील सर्व प्रकल्प सुरू असताना हा निर्णय वादाचा होता. याबाबत काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी अंशतः निर्बंध लावून हा प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती.