चंद्रपूर Tadoba Sanctuary : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व-उत्तर दिशेकडील अत्यंत महत्वाच्या वन्यप्राणी भ्रमणमार्गात 5 वर्षाआधी (23 मार्च 2018) ब्रम्हपुरी वनविभागाच्या वनक्षेत्रातील 'घोडाझरी अभयारण्य' घोषित झालं. तसंच ताडोबाच्या दक्षिणेकडील वन्यप्राणी भ्रमणमार्गात मध्य चांदा वनविभाग अंतर्गत असलेल्या वनक्षेत्रातील 'कन्हारगाव अभयारण्य' 2 वर्षाआधी (21 मार्च 2021) घोषित होऊनही अद्याप वन्यप्राण्याच्या दृष्टीनं व्यापक वन्यजीव व्यवस्थापनाच्या कामास सुरुवात झालेली नाही. सोबतच सभोवतालच्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीनं, तेथील पर्यटन विकासाच्या दृष्टीनं सुध्दा कार्यास सुरुवात झालेली नाही. यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ म्हणजे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पद वर्ग करण्यात आलेले असले, तरी त्यावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. यामुळं वन्यप्राणी व्यवस्थापन, अभयारण्यासोबतच या परिसरातील गांवाचा सुध्दा विकास खुंटल्याचा आरोप करत प्रो इको संघटनेनं आंदोलन केलं आहे.
अद्यापही पदस्थापना नाही : घोडाझरी आणि कन्हारगाव हे दोन्ही अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर व्यवस्थापनाकडं हस्तांतरण करुन, याठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज आहे. कन्हारगाव अभयारण्य घोषित होऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटुनही पदं वर्ग करण्यात आलेली असली तरी कर्मचाऱ्यांची पदस्थापना अद्याप करण्यात आलेली नाही. कन्हारगाव अभयारण्यासाठी एकूण 46 पदाची गरज असताना गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील 11 पदं वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 4 पदांचा प्रस्ताव शासनाकडं प्रलंबित आहे. तर उर्वरीत 35 पदांबाबत काहीच निर्णय नाही. घोडाझरी अभयारण्यासाठी एकूण 21 पदांवर अधिकारी-कर्मचारी नियुक्तीची आवश्यकता असताना पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला, तरी सर्व पदं रिक्तच आहेत. दोन्ही अभयारण्ये ताडोबा बफरकडं व्यवस्थापनासाठी असले, तरी मुख्यालयापासून अंतर बरेच लांब असल्यानं या अभयारण्याचं कार्यालय अभयारण्यलगतच्या तालुकाच्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. घोडाझरीसाठी 'नागभीड' तर 'कन्हारगाव'साठी गोंडपिपरी संयुक्तीक ठरेल अशी मागणी करण्यात येत आहे.
दोन्ही अभयारण्य पर्यटनाचं स्वरुप सहजीवन निर्माण करणारं असावं : चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असून त्याची किर्ती सर्वदुर आहे. पर्यटनही मोठ्या प्रमाणात सुरू असून हा प्रकल्प वाघांच्या दर्शनासाठी ओळखला जाते. घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्यामध्ये पर्यटनाचं वेगळं मॉडल निर्माण करण्याची संधी असून जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संर्घर्षाच्या पार्श्वभूमीवर जे वन्यप्राणी आणि गावकरी यांच्यातील सहजीवन अधिक योग्य प्रकारे विकसीत होऊ शकेल. आज जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचलाय. वाघ, वन्यप्राणी आणि वनविभाग पर्यायानं शासन यांच्याविषयी नकारात्मक भावना वाढीस लागत आहे. या अभयारण्याच्या परिसरातील गावांचा सर्वागीण विकासात या पर्यटनाचा हातभार पुर्णतः असावा या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज आहे.