चंद्रपूर - पवार कुटुंबियांवर आरोप करणे हे काही नवीन नाही. आता या गोष्टींची आम्हाला सवय झाली आहे. निव्वळ आरोप होतात पुढे त्याचे काहीच होत नाही. भ्रष्टाचाराचे ट्रकभर पुरावे होते, पुढे त्याचं काय झालं? मात्र पवार कुटूंबियांवर असे आरोप करणारे मात्र मोठे होत असतात. जर आमच्यामुळे कोणी मोठं होत असेल तर ही चांगलीच बाब आहे. हा तर एक सामाजिक बांधिलकीचा प्रकार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. त्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रपूर येथे आल्या होत्या.
किरीट सोमैयांना प्रत्युत्तर -
सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबियांनी बेनामी संपत्ती जमा केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमैया यांनी केला होता. जर सोमैयांकडे पुरावे असतील तर त्यांनी नक्कीच ईडीकडे याची तक्रार करावी, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसी ही काही नवी बाब नव्हे. जर काही केलंच नाही तर सापडेल तरी काय. उलट अशा ईडीच्या नोटीसीच आम्हाला लकी ठरल्या. ईडीच्या नोटीसी आणि पाऊस ह्या गोष्टी राष्ट्रवादीसाठी लकी आहेत, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याचा अजून निर्णय नाही -
जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. मात्र राष्ट्रवादीने अजून एकाही मतदारसंघावर आपली दावेदारी उपस्थित केली नाही. यावर प्रश्न विचारला असता. आम्ही याबाबत सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. अजून 2024 च्या निवडणुकांना वेळ आहे. याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे त्या म्हणाल्या.